पाली : कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवाजीपेठ भूषण सन्मानचिन्ह सोहळ्यात यंदाच्या वर्षी महामार्ग वाहतूक पोलीस रत्नागिरी विभागाच्या पोलीस निरीक्षक दिपाली जाधव साळोखे यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पोलीस विभागातील विशेष दैदीप्यमान कार्यासाठी यंदा विशेष सन्मानित करण्यात आले.
पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांनी पोलीस विभागात भरती झाल्यानंतर राज्यात विशेष कामगिरी केली आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत कोथरूड पोलीस ठाणे येथे महिला कक्ष, सायबर विभाग, सर्वेलन्स विभाग, ठाणे प्रभारी अशा विविध विभागांमध्ये कर्तव्य बजावत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली आहे. त्यामध्ये गॅंगवॉर नियंत्रणासारख्या सारख्या विषयांमध्ये तसेच महिलांचे कौटुंबिक वाढदिवस संपुष्टात आणून त्यांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी ही विशेष प्रयत्न केले आहेत. निगडी पोलीस ठाणे येथे विशेष कामगिरी केली तसेच मकोका न्यायालयामध्ये आरोपींना शिक्षा होण्यासाठी खात्याद्वारे काम केले. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाणे येथे विशेष सुरक्षा विभाग, अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा या विभागात काम केले आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक पदावरही काम केले आहे. त्यानंतर महामार्ग पोलीस विभागात मुंबई व त्यानंतर रत्नागिरी विभागात अपघात कमी होण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे. या सर्व उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून हा सन्मान करण्यात आला आहे.
शिवाजी पेठ भूषण सन्मानचिन्ह सोहळ्याला कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,पोलिस उपअधीक्षक अजित टिक्के, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, अजित खराडे, राजेंद्र चव्हाण, सचिन चव्हाण, चंद्रकांत साळोखे, कार्याध्यक्ष राहुल इंगवले,लालासो गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी-कोल्हापूर येथे शिवाजी पेठ भूषण सन्मानचिन्ह सोहळ्यात महामार्ग विभाग पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांना सन्मानित करताना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व मान्यवर