लांजा : लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असून शहरात सर्व्हिस रोड तयार करा, अशी नागरिकांची ओरड सुरू आहे. मात्र, नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सर्व्हिस रोड नसल्याने शनिवारी दुपारी बाजारपेठेत अवजड खडीवाहू डंपरचा मोठा अपघात होताना वाचला.
महामार्गाची साईडपट्टी खचल्याने डंपर शहरात महामार्गावर काही काळ अडकून पडला होता. त्यामुळे लांजा बाजारपेठेत महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होते. मात्र, या प्रकाराने सर्व्हिस रोडची गरज असल्याचा नागरिकांना पुन्हा प्रत्यय आला.
सर्व्हिस रोड व सुरक्षित साईडपट्टी नसल्याचा अनुभव नागरिकांसह कंपनीच्या ठेकेदारांना आला. महामार्गाचे काम सुरू असलेल्या कंपनीचा डंपर साईट पट्टीमध्ये रुतल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. लांजा शहरात सध्या चौपदरीकरणाबरोबर उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. मात्र, महामार्गावरील वाहतूक सुरू रहावी, यासाठी तात्पुरता साईड रोड तयार करण्यात आला आहे. हा रोड निकृष्ट दर्जाचा असल्याबाबत जनतेतून सातत्याने ओरड सुरू आहे. याकडे जाणीवपूर्वक सदरची कंपनी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून रहदारी सुरू असतानाच खडी वाहतूक करणारा डंपर रस्त्याची साईड पट्टी खचल्याने रस्त्यात अडकून पडला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक थांबली होती. डंपर रस्त्यालगत असणार्या दुकानामध्ये शिरला असता किंवा कलंडला असता तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. रस्त्यावर काम करणार्या जेसीबीच्या साह्याने अडकलेला डंपर बाहेर काढण्यात आला. दरम्यान, निकृष्ट साईडपट्टी व पासिंग रोड बाबत जनतेतून ओरड होत असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.