आगरवायंगणीतील घरातून ऐवज घेतला ताब्यात,एकावर गुन्हा
दापोली:- तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगरवायंगणी मधलीवाडी येथील ओंकार नथुराम बालगुडे याच्याकडून गावठी बनावटीची बंदूक व एयर पिस्टलसह अन्य ऐवज दाभोळ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार बालगुडे (31) याच्या ताब्यात गावठी बनावटीची बंदूक व एयर पिस्टल तसेच शिकारी करता वापरण्यात येणा-या बॅट-या व रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या बिगर परवाना बाळगल्या स्थितीत आढळून आल्या.
बालगुडे यायाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या सुमारे 2 हजार रुपये किमतीच्या गावठी बनावटीच्या एका नळीच्या बंदुकीला लाकडी बट व ट्रिगर व ट्रिगर गार्ड असल्याचे दिसून आले. सदर गावठी बनावटीची बंदूक सुमारे 48 इंच लांब व बॅरलची गोलाई 7 सेंटीमीटरची आढळून आली. त्याचप्रमाणे 2 हजार रुपये किंमती एक काळसर व लाल रंगाची फ्लास्टिक व लोखंडी बॉडी असलेली एअर पिस्टल आढळून आली. तिच्या बॅरल नळी पासून ती पाठीमागील कॅप पर्यंत लांबी सुमारे 23.5 सेंटीमीटर आहे. या पिस्टलवर ‘हॉक सिरीज’ असे इंग्रजीमध्ये व उजव्या बाजूस मध्यभागी ‘होक’ असे लिहिलेले आहे. तसेच काळसर राखाडी रंगाची एम झेड कंपनीची एम 961 मॉडेल असलेली लाल बटणे असणारी चार्जिंग बॅटरी आढळून आली. शिकारीसाठी वापरल्या जाणा-या आणखी 2 बॅट-या आढळून आल्या आहेत.
दाभोळ पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून बालगुडे याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम 1949चे कलम 3, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगुडे याला ही बंदूक व पिस्टल कोणी पुरवले, आणखी कोणाकडे असा शस्त्रसाठा आहे, या शस्त्रांचा उपयोग शिकारी व्यतिरिक्त अन्य कोणत्या कामासाठी करण्याचा उद्देश होता का, आदी गोष्टींचा तपास करण्याचे आव्हान दाभोळ पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.