आरएचपी फाऊंडेशनने केली मदत
मालगुंड किनाऱ्यावर व काजरभाटी येथे कौशल स्कुबा डायव्हिंगतर्फे प्रथमच मिळाली संधी
रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आलेले दिव्यांग मित्र-मैत्रिणींनी मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पॅरा मोटर राईडचा व काजरभाटी येथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. व याकरिता रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने (आरएचपी फाउंडेशन) सहकार्य केले.
रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनचे (आरएचपी) अध्यक्ष आणि संस्थापक सादिक नाकाडे हे स्वतः पॅराप्लेजिक (कमरेपासून खाली शरीराला संवेदना नाही) आहेत. त्यांना दिव्यांग व्यक्तींनी कोणत्याही बाबतीत मागे राहू नये, यासाठी आग्रह असतो. याची सुरवात ते स्वतःपासून करतात. मग मॅरेथॉन असो किंवा गड-किल्ले चढायचे असो किंवा कोणत्याही प्रकाराचे स्पोर्टस् असो, त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत असतात. यातूनच त्यांनी दिव्यांगाना कोणतेही काम अवघड नसते, याची प्रेरणा देतात. त्यांना पर्यटनात असलेला पॅरामोटर राईड हा अशक्य असलेल्या स्पोर्ट्सचा आनंद घ्यावा, असे वाटले. त्यांचे ओळखीचे दिव्यांग मित्र विजय रजपूत, प्रितम रजपूत, सचिन पिंपरे हे रत्नागिरीत फिरायला आले. त्यावेळी मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पॅरामोटर राईडवरून समुद्राची सफर करण्याची कल्पना दिली व स्वतः आपल्या पत्नीसोबत ते करून त्यांनाही त्याचा आनंद मिळवून दिला. एक हजार फूट उंचीवर सात मिनीटांची एकजणाची राईड होती.
पॅरामोटर राईड करताना दिव्यांगानी खूप मजा आल्याचा व आपल्या आयुष्यात जे शक्य नाही वाटत होते ते शक्य झाले असे मत व्यक्त केले. यासाठी पॅरामोटर रायडिंगचे मॅनेजर अजयकुमार दास, मदतनीस अॅंडिनो धार, डीटॉन, किनेर, मोटार ऑपरेटर चंदू यांनी मदत केली.
तसेच स्कुबा डायव्हिंग (समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील निसर्ग पाहणे)हा प्रकार दिव्यांगांसाठी अशक्य असतो तोही कौशल स्कुबा डायव्हिंग काजरभाटी येथे दिव्यांगानी पूर्ण केला.स्कुबा डायव्हिंग करताना दिव्यांगानी खूप थ्रिल आणि एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव मिळाल्याचा आनंद दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसत होता.यामध्ये हेमंत मोरे व त्यांचा स्टाफ व आरएचपीचे सदस्य समीर नाकाडे यांचे सहकार्य लाभले. या अनोख्या उपक्रमाबद्दल दिव्यांगांनी आनंद व्यक्त केला.