देवरुख:- देवरुख नगरपंचायतीने शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही निगराणीखाली आल्या आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्याचबरोबर समाजात वाढणारे गैरप्रकार यांचे गांर्भीय लक्षात घेवून शहरातील जि. प. शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रतिक मनवानी यांच्यासमवेत घेतली.
सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे आवश्यक असल्याचे तसेच याकरीता शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त होणार नसल्याने नगरपंचायतीकडून सहकार्य व्हावे अशी मागणी मुख्याध्यापक यांनी केली. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे गांर्भीय लक्षात घेवून तातडीने आयडीबीआय बँकेने त्यांचेकडील सीएसआर निधीमधून जिल्हा परिषद मालकीचे शाळांना सीसीटीव्ही बसविणेबाबत सहमती दर्शविली.
देवरुख शहरातील 9 शाळांना प्रत्येकी दोन सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर तसेच हार्ड ड्राईव्ह सहीत संपूर्ण सीसीटीव्ही संच बसविण्यात आला आहे. यामध्ये देवरुख नं.1, 2 व 3, कांगणेवाडी, मोरेवाडी, पर्शरामवाडी, कांजीवरा आदी शाळांचा समावेश आहे.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालेय आवारातील हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच सुरक्षितता राखणे शिक्षकांसाठी त्याचबरोबर पालक वर्गासाठीही दिलासादायक झाले आहे. याबद्दल मुख्याधिकारी चेतन विसपुते,शाखा व्यवस्थापक प्रतिक मनवानी यांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिक यांनी आभार मानले.