आज मिळणार पहिला हप्ता
रत्नागिरी : पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी 19 हजार 525 नवीन घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. यातील 19 हजार 300 कुटुंबांची घरकुले जि.प.ने मंजुर केली आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.या सर्व जणांना पहिला हप्ता 22 फेब्रुवारीला मिळणार आहे.
शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करणे व राज्य, जिल्हा व तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी प्रथमच 19 हजार 525 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नाहीतर पूर्वी फक्त 4 ते 5 हजार घरकूल मंजूर व्हायची. आता नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील 19 हजार 525 गरीब कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
जिल्ह्यासाठी 19 हजार 525 उद्दिष्ट देण्यात आले असले तरी सध्या 19 हजार 300 जणांना घरकुल ने जि.प.ने मंजूर केले आहे. यामधील 12 हजार 664 जणांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात 9723 घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत. त्यापैकी गेल्या वर्षातील 89 घरकुले अपूर्ण आहेत.
पहिला हप्ता देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या दिड तास अगोदर ग्रामपंचायत स्तरावर संबंधित सरपंच यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करून लाभार्थी व लोकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली. तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत स्तरावर दिसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पुजार यांनी सांगितले.
असे मिळणार अनुदान
घरकुलासाठी 1 लाख 30 हजार, स्वच्छभारत मधून शौचालयसाठी 12 हजार, नरेगा अंतर्गत रोजगारासाठी 25 ते 30 हजार असे अनुदान मिळणार आहे.