मंडणगड:- जागतिक नकाशावर कासवांचे गाव म्हणून सर्वदुर ख्याती असलेल्या कासवांच्या वेळास गावातील किनारी संरक्षित केलेल्या ऑलिव्हरिडले कासवांचा जन्म सोहळा लांबला आहे. बदललेल्या वातावरणाचा फटका कासवांच्या विणीच्या हंगामाला बसला आहे.
किनाऱ्यावरील हचेरीमध्ये 32 घरट्यातून 3579 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातून आतापर्यंत 50 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.
ऑलीव्ह रिडले समुद्री कासवांच्या संरक्षण मोहीमेमुळे मंडणगड तालुक्यातील वेळास हे गाव गेले दोन दशकापासून जगाच्या नकाशावर झळकत आहे. त्यामुळे गावात पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे. दरवर्षी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला की समुद्राकडे झेपावणारी कासवांची पिल्ले पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील पर्यटक तसेच अभ्यासक वेळास गावात मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. परंतु यावर्षी कासवांच्या विणीचा हंगाम लांबल्याने त्याचा परिणाम हा येथील पर्यटनावर झाला आहे. कासव विणीचा हंगाम वातारवणातील बदलासह विविध कारणांनी लांबणीवर गेला आहे. यापूर्वी 2021 पर्यंत अंडी संरक्षित करण्याचा हंगामास सप्टेंबर महिन्यात सुरुवात होत असे. घरट्यात अंडी संरक्षीत केल्यावर साधारपणे 90 दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात व समुद्राकडे झेपावतात. 2022 च्या हंगामात 15 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील पहीले घरटे वेळास किनारी सापडून आले होते. तर 2023 मध्ये तब्बल दोन महिने उलटून गेले तरी हंगामास सुरुवात झाली नव्हती. तीच परिस्थिती यावर्षी देखील आहे. गतवर्षी 4 जानेवारी रोजी पहिले घरटे आढळून आले होते. मागील काही वर्षात अंडी लवकर सापडल्याने जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातही कासवांचा जन्मसोहळा पाहण्याची संधी कासवप्रेमींना मिळाली होती. मात्र दोन वर्षांपासून हा महोत्सव मार्च, एप्रिलमध्ये करावा लागत आहे.
भारतातील पहिले प्रस्तावित राखीव क्षेत्र घोषित करण्याचे अनुषंगाने वेळास येथे समुद्रकिनारी अपर प्रधान मुख्य मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाहणी दौरा केला होता. वेळास ग्रामस्थांशी वेळास समुद्रकिनारा समुद्री कासव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषीत करणेबाबत सविस्तर चर्चा केली होती.