गावातच उभारला पत्रावळी, द्रोण, प्लेट बनवण्याचा उद्योग
गुहागर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवली आगरवाडी पूर्व येथील कल्पना वणे व राजेश वणे या दाम्पत्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर गावातच पत्रावळी, द्रोण, प्लेट बनवण्याचा उद्योग -व्यवसाय सुरू केला आहे. गेली अनेक वर्षे मेहनत करून मोलमजुरी करीत कुटुंब सांभाळणाऱ्या या जोडीने स्वतःचा कारखाना टाकून हा व्यवसाय सुरू केला आहे. अर्थात गेली अनेक वर्षे कामगार म्हणून काम करणारे हे पती-पत्नी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने मालक बनले आहेत. या कारखान्याचे उद्घाटन दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.
सध्या लग्नसोहळा, कौटुंबिक समारंभामध्ये प्रसाद- महाप्रसादासाठी द्रोण, प्लेट, पत्रावळीचा सर्रास वापर केला जातो. अलिकडे प्लास्टिक आणि पानांपासून तयार केलेले द्रोण आणि पत्रावळी जास्त वापरात असल्याचे दिसून येतात. वजनास हलके असल्याने सहल किंवा प्रवासात वापरण्यास देखील अगदी सोयीस्कर वाटते. आजकाल खाऊ गल्लीतील छोट्या टपरीवर सुद्धा कागदी प्लेट देतात. म्हणजेच याचा वापर वाढलेला दिसून येतो. त्यामुळे या व्यवसायात चांगली संधी आहे असे दिसून येते. तसेच कमी भांडवल गुंतवून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. यामुळे तळवली आगरवाडी पूर्व येथील कल्पना वणे व राजेश वणे यांनी अतिशय मेहनत करून जिद्दीने योगीराज उद्योग या नावाने हा व्यवसाय सुरू केला आहे. तळवली हे आजूबाजूच्या दहा गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावांतून अनेक लोक बाजार खरेदीसाठी तळवलीमध्ये येत असतात. तळवलीमध्ये हा कारखाना सुरू झाल्याने आता द्रोण, प्लेट, पत्रावळी वाजवी दरात कधीही उपलब्ध मिळणार आहेत. खरंतर आपण छोट्या छोट्या व्यवसाय उद्योगात उतरले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. अनेकजण हे नोकरीच्या शोधात असतात. मग मुंबई अथवा बाहेरच्या राज्यात किंवा कुठे मिळेल तिथे थोड्याफार पगाराची नोकरी करण्यात धन्यता मानतात. मात्र, कल्पना राजेश वणे यांनी कोणतेही पाठबळ नसताना केलेल्या धाडसाचे कौतुक अनेकांनी केले आहे. या व्यवसायामध्ये मुलगा सौरभ व मुलगी तन्वी दोघांची ही मदत लाभते. तळवलीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप आग्रे व साप्ताहिक गुहागर टाइम्स, दैनिक भैरव टाइम्स व दैनिक सार्वभौम राष्ट्रचे गुहागर तालुका प्रतिनिधी पत्रकार उत्तम पवार, सुकाई देवी कमिटीचे अध्यक्ष गणपत शिगवण, संदीप शिगवण, अशोक सांगळे, तसेच सुरेश सांगळे आदी मान्यवर व गावातील ग्रामस्थ यांनी या उद्योगाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.