रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथील श्री भवानीरुद्र सोमेश्वराचा महाशिवरात्री उत्सव शके १९४६ माघ कृ. ११ पासून फाल्गुन शु. १ म्हणजेच २४ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त अभिषेक, पूजा, नैवेद्य, आरती, देवे यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमांची सविस्तर माहिती अशी : सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री ९.३० वाजता आरती व भोवती आणि हभप गिरीषबुवा दामले यांचे कीर्तन होईल. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिलांचे भजन होईल. रात्री ८.३० वाजता आरती व कीर्तन आणि त्यानंतर रात्री १० वाजता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल.
२६ फेब्रुवारी रोजी (महाशिवरात्र) सकाळी १०.३० वाजता सामूहिक जप, पठण, परस्पर परिचय व सत्कार आणि त्यानंतर खिचडी प्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ७ वाजता भजन आणि रात्री ९.३० वाजता आरती व हभप गिरीषबुवा दामले यांचे कीर्तन होईल. २७ फेब्रुवारी रात्री ९.३० वाजता आरती व हभप गिरीषबुवा दामले यांचे कीर्तन होईल. त्यानंतर लळीताचे नाटक होईल. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी लघुरुद्र, आरती, महाप्रसाद आणि सांगतेनंतरची सभा होईल.
या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मनोहर मधुकर जोशी, उपाध्यक्षा श्रीमती दिपाली दत्तात्रय दाते यांच्यासह विश्वस्त व कार्यकारी मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.