राजापूर:- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला.
या पुरस्कारांची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींमधून सर्वांत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समीतीकडून करण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची नावे निश्चित करण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या खामशेत ग्रामपंचायतीला ४ लाख रुपये आणि चिखली ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या पुरस्कारांचे वितरण पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या स्पर्धेत ६ पैकी ४ पुरस्कार गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पटकाविले आहेत. त्यामध्ये गुहागर तालुक्याने स्वच्छतेमध्ये द्वितीय पुरस्कार खामशेत ग्रामपंचायतीने तर तृतीय पुरस्कार चिखली ग्रामपंचायतीने तर विशेष पुरस्कार आबलोली आणि उमराठ ग्रामपंचायत यांना जाहीर करण्यात आले आहेत.
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार आबलोली ग्रामपंचायत (गुहागर) (सांडपाणी व्यवस्थापन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -नाचणे ग्रामपंचायत (रत्नागिरी) (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार -उमराठ ग्रामपंचायत (गुहागर) (शौचालय व्यवस्थापन) या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.