लांजा:- दिल्ली येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी झाला आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सरहद-पुणे आयोजित हे साहित्य संमेलन दिल्ली येथील ऐतिहसिक तालकटोरा मैदानावर साजरे होत आहे.
या संमेलनात गेल्या दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेली राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था सहभागी झाली आहे.
मराठीचा जागर खेडोपाड्यात व्हावा या हेतूने गेली दहा वर्षे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने ग्रामीण मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी प्रतिकृती शोभावी, अशा प्रकारची असतात. त्या संमेलनांचा एक कार्यकर्ता म्हणून मराठीच्या अखिल भारतीय पातळीवरच्या जागरात राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा एक पोत असावा या हेतूने संघाचे अध्यक्ष व कोकणातील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे प्रवर्तक सुभाष लाड व संघाचे कार्यकर्ते,मोडीदर्पण दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक विजय हटकर या वारीत सहभागी झाले आहेत.
संघाची मुहूर्तमेढ मुंबईत १९५३ साली रोवल्यानंतर गेली ७२ वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या दोन दशकात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण,संस्कृती, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी संमेलने चर्चेपेक्षा वादचर्चेनेच जास्त गाजताहेत.आणि हे वादही सहित्यबाह्य चर्चेतून होत आहेत. अनेक साहित्य संमेलनांत त्याचा अनुभव मराठी जनांना आला आहे. अशा वेळी या वादांच्या पल्याड जाऊन महाराष्ट्राला विवेकवादाचा प्रारंभ करुन देणाऱ्या रत्नभूमीतील राजापूर – लांजा या दोन तालुक्यांची प्रातिनिधीक संस्था परिसरातल्या साहित्यप्रेमींना एकत्रित करून साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण सहित्य संमेलने संघ आयोजित करत असून याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत आहेत. या संमेलनांच्या निमित्ताने व्यक्त होणाऱ्या नव्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. माय मराठीचा प्रचार प्रसारासाठीही ते पूरक ठरत असते. अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाला न जाता येणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसाठी ही साहित्य जत्रा उत्साहदायी, त्यांच्या लेखन ऊर्मीला जागविणारी ठरते. आपल्या प्रांतातील दिग्गज साहित्यिकांविषयी आदरभाव प्रसारित होतो. भाषा समृद्धीच्या या जागरासाठी संघ दरवर्षी अनेक साहित्यिक, चित्रकार, कलाकारांना निमंत्रित करीत असतो.
यंदा एक अपूर्व योग जुळून आला आहे.आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत साजरे होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब असल्यानेच ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करणारी कोकणातील अग्रगण्य संस्था असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने शारदेच्या या वार्षिक अक्षरोत्सवात सहभाग घेतल्याचे संघ अध्यक्ष सुभाष लाड यांनी सांगितले.