संगमेश्वर:- मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी पक्का रस्ताही पूर्ण झालेला आहे; मात्र आंबाघाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा तळावरून गोवरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
मिऱ्या-नागपूर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे; मात्र काही ठिकाणी काम व्यवस्थित असले तरीही काही ठिकाणी काम अपूर्ण ठेवले गेले आहे. माती व खडीने रस्ता भरल्यामुळे गाड्या घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. या मार्गांवरून अनेक विद्यार्थीदेखील दररोज प्रवास करतात. त्यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरकटाई झाल्याने उभा चढ तयार झालेला आहे. एका बाजूला दरी असल्यामुळे तेथील स्पॉट वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे.
त्यामुळे महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीने यावर ताबडतोब कार्यवाही करावी, अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर साखरपा येथील माजी सरपंच विनायक गोवरे यांनीही अपूर्ण रस्त्यावर ताबडतोब उपाययोजना करावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पावसाळ्यात या रस्त्याला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे वाहने चालवताना चालकांची अडचण होत होती. त्या वेळीही महामार्ग विभाग, ठेकेदार यांनी पाहणी करून रस्ता तयार करून देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर तात्पुरती डागडुजीही करण्यात आली; परंतु पुन्हा त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर आंदोलन करावे लागेल.
– विनायक गोवरे, माजी सरपंच