कुडाळ : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेताळबांबर्डे पुलावर पलटी झालेल्या आयशर टेम्पोला कंटेनरची धडक झाली व कंटेनर पुलाच्या संरक्षक कठड्यावर चढला. सुदैवाने कंटेनर नदीपात्रात कोसळण्यापासून बालंबाल बचावला.
गुरूवारी रात्री 12.15 वा.च्या सुमारास झालेल्या या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोवा ते मुंबई औषध वाहतूक करणारा आयशर टेम्पो वेताळबांबर्डे पुलाजवळ आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोने पुलाच्या संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पो लेनवरच उलटा फिरला. त्याचवेळी मागाहून गोवा ते जेएनपीटी मुंबई अशी ब्रशांची वाहतूक करणार्या कंटेनरची टेम्पोला जोरात धडक बसली. यात आयशर टेम्पो महामार्गावरील लेनवरच पलटी झाला तर ट्रेलर पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन धडकला. यात ट्रेलरच्या चालकाची केबिन थेट संरक्षक कठड्यावर चढली. मात्र कंटेनर मोठा असल्याने लेनच्या साईडला जात, केबीन संरक्षक कठड्याला अडकली. त्यामुळे हा कंटेनर सुदैवाने नदीपात्रात कोसळण्यापासून बालंबाल बचावला.
आयशर टेम्पोची संरक्षक कठड्याला धडक एवढी जबरदस्त होती की, टेम्पोच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. तसेच समोरील दोन्ही चाकांचा रॉड तुटून चाके निखळली. आयशर लेनवर पलटी झाल्यानंतर चालक टेम्पोच्या केबीनमध्येच अडकून राहीला होता. त्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला दुखापत झाली असून, कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या डायल 108 रूग्णवाहीकेने उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातादरम्यान महामार्गाच्या या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कुडाळ पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पलटी आयशर टेम्पो बाजूला करून लेन वाहतुकीस सुरळीत करण्यात आली.