सिंधुदुर्ग:-गणेवाडीतील भराडी मातेच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होणार असून दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत. यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे.
आजच्या दिनी मातेचे तेजोमय मनोहारी रूप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभार्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. सभा मंडप व गाभार्याचे रंगरूप फुलांच्या सजावटीने अवर्णनीय नयनरम्य असेच भासत असल्याने भक्तांसाठी नंदनवनाची अनुभूती पाहायला मिळणार आहे.
नवसाला पावणार्या व भवानीचे रूप असलेल्या भराडीमातेच्या दर्शनासाठी खा. नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेते विनोद तावडे, आ. नीलेश राणे, भाजप आ. भाई गिरकर, आशिष शेलार, माजी आ. वैभव नाईक यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार, महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे.
ओट्या भरण्यास पहाटे 3 वाजल्यापासून प्रारंभ
यात्रोत्सवास ओट्या भरण्यास शनिवारी पहाटे 3 वाजता प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजिक पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने अखंडीत वीज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रमूख सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कार्यरत असणार आहेत.
रात्री 9.30 ते 12 या वेळेत ओट्या भरण्याचा कार्यक्रम राहणार बंद
रात्री 9.30 ते 12 या वेळेत धार्मिक विधीसाठी ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद असणार असल्याची माहिती अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली. महनीय व्यक्तीं साठी मुख्य स्वागत कक्षालगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दहा रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगून देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई
शनिवार 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वा. यात्रेस सुरुवात होणार आहे. रविवार 23 फेब्रुवारी पर्यंत यात्रोत्सव दोन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवानिमित्त देवालयाच्या परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे. यावर्षी प्रथमच मंडळाकडून यात्रा परिसरातील कणकवली व मालवण बस स्टँड ते मंदिर पर्यंत अपंगांसाठी रिक्षा आणि व्हीलचेअरची सोय उपलब्ध आहे.
परिसर दुकानांनी गजबजला
मेवा मिठाईच्या दुकानांसह अन्य विविध दुकानांनी आंगणेवाडी परिसर गजबजून गेला आहे बच्चे कंपनीला खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहेत. तसेच आकाश पाळणा, फनी गेम्स इत्यादी करमणुकीची साधने उपलब्ध आहेत.
उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे
जत्रोत्सव भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत होणार असल्याने.भराडी देवीचा वार्षिक उत्सव आणि सर्व विधी निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.