रत्नागिरीतही गाड्यांची विक्री
रत्नागिरी : इर्टिगा गाड्या भाड्याने लावतो सांगत, नवीन गाड्या खरेदी करायला लावून त्या गाड्यांची थेट डेमो कार म्हणून विक्री करणाऱ्या खेड तालुक्यातील कुंदन यादव (वय २३, सध्या रा. वडगा बुद्रुक, नवले पुलाजवळ) याच्यासह दोघांना पुणे पोलीसांनी अटक केली आहे. तर त्यांनी यातील काही कार रत्नागिरी जिल्ह्यात विक्री केल्या आहेत. त्यातील १६ गाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. गाडी विक्री केल्यानंतर काही पैसे गाडीच्या मूळ मालकाला प्रत्येक महिन्याला देत असत. त्यामुळे आपली गाडी पैसे कमावून देतेय असे वाटत होते.
परंतु जेव्हा खरा प्रकार समोर आला तेव्हा अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी भाड्याने लावलेल्या गाड्या दोघा ठगांनी परस्पर विक्री केल्या होत्या. या रॅकेटचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ६३ लाखांच्या १६ इर्टिगा गाड्या जप्त केल्या आहेत.
कुंदन यादव (वय २३, रा. वडगा बुद्रुक, नवले पुलाजवळ, मूळ खेड, रत्नागिरी), गिरीष सणस ऊर्फ संदीप ऊर्फ सौरभ सुनील काकडे (येरवडा) अशी दोघा ठगांची नावे आहेत. सातारा येथील प्रथमेश नलावडे यांनी त्यांची इर्टिगा कार दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी खराडी येथील सिटीव्हीस्टा बिल्डींगमध्ये आरोपींनी सुरू केलेल्या पॅलेस कार रेन्टलमध्ये दरमहा ४५ हजार रुपये पॅकेजवर भाड्याने दिली होती.
आरोपींनी नलावडे यांचा विश्वास संपादन केला. परंतु काही दिवसानंतर नलावडे यांना त्यांची कार पाथरी परभणी येथील अशोक कुरढाने यांना विक्री केल्याचे समजले. त्यांनी याबाबत खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेव्हा पॅलेस कार रेन्टल हे ऑफिस बंद असून सर्व जण फरार झाल्याचे पुढे आले. तपासात अशाच प्रकारे या टोळीने तब्बल १६ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले.
आरोपींचा शोध घेत असताना, पोलिस हवालदार महेश नाणेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुंदन यादव हा खराडी येथील स्वीट इंडिया चौकात थांबला आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी यादव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शिरीष काकडे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. तो येरवडा कारागृहात होता. खराडी पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडून मिळालेली माहिती आणि मोबाईल, गाडीचे जीपीएसद्वारे १६ इर्टिगा गाड्या जप्त केल्या.
आरोपींनी या गाड्या सातारा, सांगली, कराड, गेवराई, जालना, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी डेमोकार म्हणून विक्री केल्या होत्या. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल कोपे, संतोष म्हत्रे, अंमलदार सुरेंद्र साबणे, नवनाथ वाळके, अमोल भिसे, अमित जाधव, सचिन पाटील, प्रफुल मोरे, मुकेश पानपाटील, श्रीकांत कोद्रे, प्रवीण गव्हाणे यांच्या पथकाने केली.