राजापूर:-राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्या प्रकरणी शमसूद्दीन गुलाब ताजी (- 35, रा. कोळपे, वैभववाडी) याच्यावर राजापूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान त्या घटनेनंतर पाचल परीसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी यशस्वीपणे परिस्थिती हाताळली.
गुरूवार दि.20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शमशुद्दीन गुलाब ताजी हा पाचल येथे कामानिमित्त आला होता. पाचल बाजारपेठेत इकडे तिकडे फिरताना तो आढळून आला. बाजारपेठेत अनोळखी माणूस फिरत असल्याचे आढळून आल्याने पाचल येथील काही ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्याने अरेरावीची भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे काही काळ पाचल बाजार पेठेत तणाव निर्माण झाला होता. जनभावना संतप्त बनल्या होत्या. सुदैवाने पोलीस यंत्रणा त्वरीत घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी त्वरीत शमसूद्दीन ताजी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रायपाटण पोलीस दूरक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले. दरम्यान या घटनेची खबर मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे देखील रायपाटनला दाखल झाले. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शमसुद्दीन गुलाब ताजी याच्या विरुध्द राजापूर पोलिसांनी 353 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.