अटकेतील तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत
खेड:-तालुक्यातील खोपी-रघुवीर फाट्यानजिक गांजा वाहतूकप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गांजा प्रकरणात 2 स्थानिक संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले असून दोघेही संशयित येथून पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. संशयितांनी ओडिसा येथून गांजा आणल्याचे तपासात समोर आले असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गांजा वाहतूकप्रकरणी गजाआड केलेल्या लक्ष्मण कुंदन भोरे (40), उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (36, दोघे रा. माझगावकर माळ झोपडपट्टी, सातारा), अविनाश हरिशांद्र मोरे (45, -महाबळेश्वर) या तिघांनी यापूर्वीही गांजा विक्री केल्याचे पोलिसांनी 7-8 महिन्यांपूर्वी उघडकीस आणले होते. या पाठोपाठ दुसऱ्यांदा 2 किलो 84 ग्रॅम वजनाचा गांजा वाहतूक करताना पोलिसांनी सापळा रचून एका महिलेसह दोघांना जेरबंद केले. गांजासह स्कॉर्पिओ व्हॅन, दुचाकी असा 31 लाख 56 हजार 747 रूपयांचा ऐवजही जप्त केला आहे.
सातारा येथून आणलेला गांजा शहरातील दोन स्थानिक व्यक्तींना विकला जाणार होता, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. गांजा वाहतूकप्रकरणी एका महिलेसह दोघांना गजाआड केल्याचा सुगावा लागताच दोन्ही स्थानिक संशयितांनी येथून पोबारा केला. दोघांचेही मोबाईल बंद असल्याने नेमक्या ठिकाणांचा पोलिसांना अजून सुगावा लागलेला नाही. दोघेही येथे राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी झाडाझडतीही घेतली. अटकेतील तिघांकडून जप्त केलेला गांजा ओडिसा येथून आणल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे गांजा प्रकरणात काहींचा सहभाग असल्याची दाट शक्यता असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान येथील पोलिसांसमोर आहे.