चिपळूण:-गेल्या तेरा वर्षात महाराष्ट्र-गोव्याला जोडणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प पुर्ण होऊ शकला नाही याबाबतच्या नाराजीची सल स्थानिकांसह आम्हा लोकप्रतिनिधींनाही आहे. महामार्ग रखडण्याची कारणे अनेक असली – तरी. त्यातून मार्ग काढला जात आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग चाकरमान्यांच्या प्रवासासाठी सुरळीत सुसज्ज असेल, त्यासाठी अभियंत्यांना अपूर्ण कामें पुर्ण करण्याच्यादृष्टीने कामाची गती वाढवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरूवारी महामार्ग पाहणी दौऱ्यात दिली.
ज्या ठिकाणी कामे अपूर्ण असतील तेथे पर्यायी मार्गसह अन्य उपाययोजना करा, जेणेकडून चाकरमान्यांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार नाही. एकूनच आगामी गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी हा महामार्ग पूर्ण सज्ज झालेला असेल. तरीही नव्याने होणारे पूल, काही पर्यायी रस्ते याबरोबरच नव्याने करावे लागणारे भुयारी मार्ग पूर्ण होण्यासाठी मात्र डिसेंबर महिना उजाडेल, असेही सांगितले.
दरम्यान सकाळी रायगड जिल्हयातील पळस्पे फाटा येथून मंत्री भोसले यांचा महामार्ग पाहणी दौरा सुरू झाला. रायगड जिल्हयात विविध ठिकाणी दौरे व बैठका पार पडल्या. परिणामी रत्नागिरी जिल्हयात त्यांचे रात्री उशीराने आगमन झाले. कशेडी बोगदा, परशुराम घाटाची ते पाहणी करणार असल्याने सायंकाळी ५ वाजल्यापासून अधिकारी, नागरिक परशुराम घाटापासून ठिकठिकाणी थांबून होते.