खेड / प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडाया दोन्ही बोगद्यात प्रत्येकी 20 पंखे बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. बोगद्यातील किरकोळ कामांच्या पूर्ततांनाही वेग आला आहे. वीजेसाठी भरावी लागणारी 80 लाखांची अनामत रक्कम जमा करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आता बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होण्याची प्रतीक्षा आहे. दुसरा बोगदा वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होईल, हे अद्याप राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कशेडी बोगद्यातून वाहनालकांचा प्रवास सुखकर अन् वेगवान झाला असला तरी आजवर अनेकवेळा ऐनकेन कारणांनी अडथळयांचा ‘स्पीडबेकर’ उभा ठाकला. सद्यस्थितीत एका बोगद्यातून दोन्ही बाजुकडील वाहतूक सुरू आहे. दुसरा बोगदा अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर दुसरा बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्याची ‘डेडलाईन’ हुकल्यापासून राष्ट्रीय महामार्ग खात्याने बोगद्यात पंखे बसवण्यासह रस्ते व इतर किरकोळ कामांना गती दिली आहे.
सद्यस्थितीत दोन्ही बोगद्यात 20 पंखे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामांसह बारीकसारीक कामे देखील युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर बोगदे वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुले होतील, अशी बांधण्यात आलेली अटकळ फोल ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठयासाठी महावितरणला 80 लाख रुपयांची अनामत रक्कम राष्ट्रीय महामार्ग खात्याला भरावी लागणार आहे. ही रक्कम भरण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाल्यानंतर दुसरा बोगदाही पूर्ण क्षमतेने बोगद्यातील वाहतूक खुली होणार आहे. यामुळे वाहनचालकांना आणखी काही दिवस तरी वाहतूक खुली होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.