रत्नागिरी : बदलत्या काळात मनोरंजनाच्या आधुनिक पद्धतीचा होणारा वापर आणि वेगवान जीवनशैलीमुळे त्या पद्धतींचे जाणवणारे सहजसोपे सादरीकरण आपण सगळेच जण जाणून आहोत. यू- ट्यूब, इंस्टाग्राम सारख्या माध्यमातून सादर होणारे या पद्धतीचे अनेक पॉडकास्टशो, वेगवेगळ्या मुलाखती, वेगवेगळे ब्लॉग्ज अशा अनेक प्रकारातून आपण ते अनुभवत आहोत. विशेषतः तरुणाईला यात विशेष रुची निर्माण होत आहे. अशाच एका क्षेत्रात उत्तमपणे एक यूट्यूब चॅनल चालविणारा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा एक तरुण सुयोग रिसबूड, हा त्याचा एक नवा कोरा कार्यक्रम अर्थात ‘सुतारफेणी’ घेऊन आपल्यासमोर येत आहे. निमित्त आहे ते चतुरंग प्रतिष्ठानच्या रत्नागिरी आणि चिपळूण केंद्राच्या वर्धापनदिनाचं.
कोकणशाळांत सुरू झालेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे निमित्त असतानाच पुढे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनातून अनेक कार्यकर्ते एकत्र येत सुमारे २७ वर्षापूर्वी चतुरंग चिपळूण केंद्राची सुरुवात झाली आणि चतुरंग निवासी वर्गातील विद्यार्थी पुढे शिक्षणासाठी रत्नागिरीत आल्यावर त्यांच्या एकत्रिकरणातून तरुण कार्यकर्त्यांचे असे रत्नागिरी केंद्र ८ वर्षापूर्वी सुरू झाले. असे दोन्ही केंद्रांचे वर्धापन दिन फेब्रुवारी महिन्यात असल्यामुळे याठिकाणच्या रसिकांना एखाद्या कार्यक्रमाची मेजवानी देऊन वर्धापनदिनाचा आनंद साजरा करत रसिकांचे आशिर्वाद घ्यावेत या विचाराने रत्नागिरी आणि चिपळूण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तम कंटेंट क्रिएटर, उत्तम डिझाईन इंजिनिअर, उत्तम म्युझिशियन असणाऱ्या सुयोग ला आपण व्हायफळ या त्याच्या YouTube चॅनेल वरून अनेक कलाकार, मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा मारताना पाहतो. त्याच्या युनिक स्टाईल मध्ये तो समोरच्याला बोलतं करताना आपण पाहतो. रसिकांचा प्रत्यक्ष प्रतिसाद मिळला तर अजून छान मजा येईल अशा विचारातून सुयोगने गप्पा, गाणी, गोष्टी अशा सगळ्याच उत्तम मेळ साधत सुतारफेणी नावाच्या एका आगळ्यावेगळ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
धम्माल गप्पांमधून आपल्याला खिळवून ठेवणारा असा हा कार्यक्रम शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ६:१५ वाजता तर रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी ६:१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरुण विद्यार्थी मित्र मैत्रिणी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतीलच पण वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्या जाणत्या दर्दी रसिकांनी सुद्धा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसह अवश्य या विनामूल्य कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. त्याचा पॉडकास्ट जर आपल्याला एवढा खिळवून ठेवतो तर प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम किती बांधून ठेवेल याचा विचार करून आपण अवश्य यावे असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.