रत्नागिरी :तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई मार्गदर्शनाखाली पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने योगीराज तायक्वांदो अकॅडमी पुणे आयोजित पाचवी खुली राज्य तायक्वांदो स्पर्धा २०२५ बालेवाडी (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून १८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी सुवर्णकन्या आणि रत्नागिरीतील एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने सहभाग घेतला होता.
सुरुवातीला स्वरा हिने कॅडेट गटात फ्री स्टाईल पूमसे प्रकारात सुवर्णपदक मिळवले, तर क्युरोगीमध्ये कॅडेट गटात ३७ किलो खालील वजनी गटात सुवर्णपदक मिळवून आपल्या दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली.
या स्पर्धेसाठी स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख तसेच मिलिंद भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे शाहरुख शेख यांनी केलेली ऑन फिल्ड कोचिंग या स्पर्धेत लक्षवेधी ठरली.
बारामतीमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
स्वरा ही गेली चार वर्ष तायक्वांदोचे धडे घेत आहे. या कालावधीत तिची तायक्वांदोमधील कामगिरी ही अविस्मरणीय ठरली आहे. आजपर्यंत २४ सुवर्णपदके, १६ रौप्यपदके आणि १२ कांस्यपदके अशी ५२ पदके घेऊन उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. याची दखल घेऊन नवक्रांती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती आणी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वरा साखळकर हिला गुणवंत खेळाडू हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वराने मिळवलेल्या दुहेरी कामगिरीमुळे तिला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, प्रफुल्ल हातीसकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वरा ही सध्या ती इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.