संगमेश्वर:-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसब्याच्या ऐतिहासिक भूमीत गेले १५ महिने नित्यपूजेचे व्रत सुरू आहे.
कसबा गावाला इतिहास आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माती आहे. तेथे शक्ती आणि भक्तीचे सुंदर वलय आहे. या भूमीत मौर्य, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, मोरे, सुर्वे, शिर्के अशा कित्येक क्षत्रिय घराण्यांचा इतिहास आहे. मात्र, महाराष्ट्रासमोर संगमेश्वरची ओळख धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले ते कसबा-संगमेश्वर अशी झाली आहे. हा काळिमा पुसून संगमेश्वरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्म आणि त्यागाच्या मार्गावर चालणारा तालुका, शिवशंभूपाईकांचा तालुका ही ओळख प्राप्त करून देण्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रयत्नशील आहे. त्यातील सर्व धारकरीबांधवांनी, कसबा ग्रामस्थ आणि संगमेश्वरमधील कित्येक गावातील श्री शिवशंभूपाईकांसमवेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे नित्यपूजनाचे अखंड व्रत गेले सुमारे दीड वर्ष सुरू ठेवले आहे.
महाराजांची दररोज विधिवत पूजा झाली पाहिजे, संगमेश्वरमधील सर्व नागरिकांना शंभूराजांच्या त्यागाचे, बलिदानचे महत्त्व समजले पाहिजे, धर्मनगरी कसबा-संगमेश्वरकडे शिवपाईकांची ओढ वाढली पाहिजे, कसबा-कारभाटले आणि शृंगारपूरचे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व प्रखरतेने झळकले पाहिजे, असा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक नित्यपूजा समिती प्रमुख धारकरी सिद्धेश चव्हाण, नित्यपूजन नियोजन समन्वयक श्रेयस शेट्ये, निशांत जाखी, जीवन जाधव, अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.