संगमेश्वर:-काल गुरुवार दि. २० फेब्रुवारी, २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र व श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संविधान अमृत महोत्सवाच्या “हमारा संविधान… हमारा अभिमान” या विशेष कार्यक्रमासाठी देवरुखच्या श्री. विलास विजय रहाटे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची रांगोळी साकारली होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. वीरेंद्र कुमार (मा. केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, भारत सरकार) होते. प्रमुख उपस्थिती श्री चंद्रकांत (दादा) पाटील (मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य) यांची होती. याचबरोबर सन्माननीय उपस्थितांमध्ये श्री. अमित यादव (भा. प्र. से.), सचिव, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, भारत सरकार आणि श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी (भा. प्रा. से.), अतिरिक्त मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, तर अध्यक्षस्थानी प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), प्राचार्य (डॉ.)अजय भामरे (प्र. कुलगुरू मुंबई विद्यापीठ), डॉ. प्रसाद कारंडे (कुलसचिव, मुंबई विद्यापीठ) यांची उपस्थिती होते.
विलास रहाटे यांनी साकारलेली रांगोळी पाहून केंद्रीय मंत्री मा. डॉ. वीरेंद्र कुमार भावुक झाले, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत आदर व्यक्त करून नमस्कार केला. केंद्रीय मंत्री मा. डॉ. वीरेंद्र कुमार यांनी एका विशेष समारंभासाठी रांगोळी साकारण्याकरीता श्री. विलास रहाटे यांना दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. महाराष्ट्राचे मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनीही विलास यांचे भरभरून कौतुक केले.
गेली पाच वर्षे मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही विशेष कार्यक्रमासाठी श्री. विलास रहाटे यांची रांगोळी हमखास असतेच. विलास यांची पोट्रेट रांगोळी पाहून विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. रांगोळी कलेतील पोट्रेट(व्यक्तिचित्र) या कठीण प्रकार विलास यांनी उत्तम कौशल्य प्राप्त केले आहे. व्यक्तिचित्र व निसर्ग रांगोळी कला प्रकारात विलास यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त किती आहेत. विलास गेली तीन वर्ष मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमचे यशस्वी मार्गदर्शक राहिले आहेत.विलास यांच्या रांगोळी कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.