लांजा:-लांजातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त विलवडे येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेला भेटवस्तु देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
शिवजयंती आली की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या, असा संदेश वेगवेगळ्या व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रमातून ऐकावयास मिळतो. हे प्रत्यक्षात लांजा तालुक्यातील तळवडे येथील स्वराज प्रतिष्ठानच्या शिवप्रेमींनी करून दाखविले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विलवडे येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी मुलांना जीवनावश्यक वस्तु आणि खाऊचे वाटप केले.
दरम्यान, यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे सचिव सुदर्शन आंबेकर, खजिनदार सुनील पाटोळे, प्रवीण पाटोळे, प्रदीप आयरे तसेच शाळेचे शिक्षक अशोक कांबळे, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.