गावठी काजू बीसाठी किमान १६० रुपये आणि वेंगुर्ला काजू बीसाठी १८० रुपये हमीभाव शासनाने देण्याची मागणी
रत्नागिरी: काजू बी शेतकरी संकटात आहे. या उत्पादकांना किलोमागे हमीभाव नसल्यामुळे उत्पादन करणे शक्य होत नाहीये. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावठी काजू बीसाठी किमान १६० रुपये आणि वेंगुर्ला काजू बीसाठी १८० रुपये हमीभाव शासनाने द्यावा, या मागणीसाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले.
आज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काळे यांनी उपोषण केले. दिवसभरात अनेक शेतकरी, नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
कृषीखात्यातील अधिकाऱ्यांनीही भेट देऊन आपली मागणी पुढे पाठवत असल्याचे सांगितले. काळे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो काजू बागायतदार आहेत. गेली काही वर्षे गावठी आणि वेंगुर्ला काजू बीला व्यापारी, दलाल प्रतिकिलोला ९० ते १२० रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान विकत आहेत. हा दर सध्या १५० ते १६० रुपये आहे; परंतु तो कायमस्वरूपी राहत नाही. काजू बीचा पुरवठा वाढला की, हा दर उतरतो; परंतु शेतकऱ्याची मेहनत मात्र कमी होत नाही. ती मेहनत करावीच लागते. गोव्यामध्ये हमीभाव १५० वरून १७० रुपये करण्यात आला आहे. त्याच प्रकारे कोकणातही हमीभाव दिला पाहिजे.
गेल्या वर्षी काजू बीसाठी काजू बोर्डातून प्रतिकिलो दहा रुपये अनुदान शासनाने हंगाम संपताना जाहीर केले होते. बरेचसे शेतकरी वजन खूप होत असल्याने घरी येणाऱ्या खरेदीदाराकडे बिया विकतात. त्यामुळे जीएसटी सोडा पक्की पावती मिळण्यातसुद्धा अडचणी येतात. त्यामुळे अनुदान मिळण्यासाठी देखील अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले.
अनुदान प्रक्रिया किचकट
रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास दीड लाख काजू उत्पादक शेतकरी आहेत; मात्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी फक्त ४५० जणांनी नोंदणी केली आहे. ही प्रक्रिया किचकट असल्यानेच नोंदणी जास्त झाली नाही. त्यामुळे अनुदानाऐवजी हमीभाव द्या. रत्नागिरी जिल्ह्यात काजूची झाडे चांगली, जुनी मोठी आहेत. त्यामुळे उत्पादन चांगले आहे; परंतु हमीभाव नाही. अधिकारी, मंत्र्यांना उपोषणाचे पत्र पाठवूनही कोणी लक्ष न दिल्यामुळे आज लाक्षणिक उपोषण केले. यातून मार्ग निघावा, हमीभाव देऊन काजू बी उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी अविनाश काळे यांनी केली.
किलोमागे खर्च १२० रुपये
काजूबागा साफ करणे, निगा राखणे, मजुरीचे गगनाला भिडलेले दर, विविध रोगांमुळे काजूवर अपरिहार्य झालेली फवारणी, त्याचा खर्च, काजू बी धरल्यापासून पुढे सुकवून विकेपर्यंत होणारा खर्च, पडलेल्या बियांचे साळिंदर, उंदीर आणि इतर प्राण्यांपासून होणारे नुकसान यामुळे एक किलो बीसाठी येणारा खर्च जवळपास शंभर ते एकशेवीस रुपयांच्या पुढे जातो. मिळणाऱ्या कमी दरामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही, असे अविनाश काळे म्हणाले.