रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा. ही परीक्षा आजपासून (ता.२१) पासून सुरू होत आहे. यासाठी कोकण बोर्ड सज्ज झाले आहे. जिल्ह्यात १८ हजार ८३४ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी ७३ परीक्षाकेंद्र सज्ज झाली आहेत. कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षाप्रक्रियेसाठी कोकण बोर्डाने पूर्ण तयारी केली आहे.
कोल्हापूर व कोकण विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी डायटचे प्राचार्य, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, गटशिक्षणाधिकारी, परिरक्षक, केंद्र संचालक आणि माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यामध्ये परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा, तालुका, परीक्षा केंद्र व शाळास्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षता समितीचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी भरारीपथक व बैठ्या पथकाचे नियोजन केले आहे. एखाद्या पेपरला हॉलतिकीट विसरल्यास घाबरून न जाता पर्यवेक्षक/केंद्रसंचालकांना सांगावे. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते; पण जाणीवपूर्वक विसरू नये. केंद्रसंचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे. दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र न चुकता आणावे. ते केंद्रसंचालकांना दाखवावे. एखादे उत्तर चुकल्यास किंवा उत्तर बदल करावयाचा असल्यास उत्तरावर काट मारावी. कोणत्याही परिस्थितीत उत्तर चुकले आहे म्हणून उत्तरपत्रिकेचे पान फाडू नये. घाबरून ते सोबत घेऊन जाऊ नये. अशी कृती केल्यास गैरमार्ग ठरवून शिक्षेस पात्र व्हाल याची नोंद घ्यावी, अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेबाबत पालक व परीक्षार्थी यांच्याकडून वारंवार प्रश्न शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी व मंडळाकडे विचारले जातात. त्यातील अधिकाधिक विचारल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांचे संकलन करून ते प्रसारित केले आहेत.
– राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.