मुंबई:- डायल 108 ही सुविधा सुरू झाल्यापासून, राज्यात तब्बल 40 हजार 791 गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली आहे, तर हजारो गर्भवतींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
4 हजार 167 महिलांना व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात आले आहेत. गर्भवती महिलांसाठी ही रुग्णवाहिका संकटकालीन जीवनदायी ठरली आहे.
अतितातडीच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. गर्भवती महिलेस प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यास रुग्णवाहिकेला बोलावता येते. त्या गर्भवतीला जवळच्या रुग्णालयात ही रुग्णवाहिका दाखल करते. उपचारावेळी प्रथम शासकीय रुग्णालयास प्राधान्य दिले जाते. तथापि, रुग्णालयात घेऊन जाताना अनेक महिलांची प्रसूती धावत्या रुग्णवाहिकेतच होते. येथे डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि संबंधितांना प्रसूतीचे प्रशिक्षण दिल्याने महिलेची प्रसूती सुखरूप होते. प्रसूतीसाठी आवश्यक साधने रुग्णवाहिकेतच उपलब्ध असतात. प्रत्येक प्रसूतीवेळी नवीन उपकरणांचा वापरही केला जातो. त्याचबरोबर रुग्णवाहिका जंतुनाशक औषधांद्वारे फवारणी करून स्वच्छ केली जाते.
रुग्णवाहिका ठरली जीवनदायी
तत्पर व सुसज्ज सेवा यामुळे राज्यातील 40 हजार 791 महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,683 महिलांनी रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला आहे. डायल 108 ही रुग्णवाहिका जिल्ह्यातील खेडोपाड्यात रात्रंदिवस धावताना दिसते. सुखरूप सेवा देऊन रुग्णांना ही रुग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे.