रत्नागिरी ःरत्नागिरी तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भू संपादनासंदर्भातील मोजणी करण्यासाठी गेलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्यांना कळझोंडी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले नाही.
त्यामुळे एका खासगी जमिनीची मोजणी करून अधिकार्यांना माघारी जावे लागले. ही प्रक्रिया मान्य नसल्याबाबत ग्रामस्थांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना लेखी निवेदनही दिले.
तालुक्यातील वाटद एमआयडीसीसाठी लागणार्या भूसंपादनाच्या मोजणीला कळझोंडी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. मोजणीसाठी आवश्यक असलेले कोणतेही सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मोजणीसंदर्भातील नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. परिसरातील एका खासगी मालकीच्या 15 एकर जमिनीची मोजणी करून भूमीअभिलेखचे पथक माघारी गेले.
भूमीअभिलेख विभागाकडून कळझोंडीतील जमीनमालक, शेतकरी व इतर जागा मालकांना वेळेत नोटीस मिळालेल्या नाहीत. अनेकांना मोजणी संदर्भातील नोटीस मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर विश्वासात न घेता आणि पूर्वसूचना न देता जमीन मोजणीसाठी पथक आल्याने असहकार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रांताधिकार्यांनी काढलेल्या नोटीसबाबत ग्रामस्थांनी मोजणी करणार्या पथकावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी ग्रामस्थांतर्फे उमेश रहाटे, दीपक चौगुले, सहदेव जोगळे, शांताराम कीर यांनी गावाचे नेतृत्व करत अधिकार्यांना तेथेच निवेदन दिले. यावेळी पोलिस बंदोबस्त सुद्धा मागविण्यात आला. परंतू ग्रामस्थ आक्रमक असल्याने एका खासगी जमिनीची मोजणी करून भूमिअभिलेखचे पथक कळझोंडी गावातून माघारी फिरले.