पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी राजापुरात, अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती
राजापूर: शहरातील चिंचबांध येथील सुर्यमंदिर परिसरात अनधिकृतरित्या अचानक उरुस करण्यात आल्याने राजापुरातील सनातन हिंदू बांधव आक्रमक झाले आहेत. याबाबतची माहिती मंत्री नितेश राणे यांना देण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्ते ही दाखल झाले. तसेच शिवसैनिक मोठया संख्येने दाखल झाले. या घटनेनंतर आज दिवसभर परिसरात तणावाचे वातावरण आहे. अनधिकृत उरूस करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्यात आक्रमक ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. या नंतर संतप्त ग्रामस्थांच्या आक्रमकपणामुळे चींचबाध परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनधिकृत उरूस प्रकरणी पोलिसांनी 50 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चींचबाध सूर्यमंदिर परिसरात उरुसाला परवानगी देवु नये व याठिकाणी उरुस साजरा करण्यात येवु नये यासाठी आज सकाळी सनातन हिंदू बांधवांनी निवेदन दिले होते. अनधिकृत पणे उरूस साजरा केल्यास आम्ही त्याठिकाणी महाआरतीचे आयोजन करु असा इशाराही देण्यात आला होता. मात्र तरीही या परिसरात उरूस करण्यात आला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. आज दिवसभर शहर परिसरात तणावाचे वातावरण आहे. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत शांतता राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहे असे समजते. अनधिकृत उरूस साजरा केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही. या प्रकाराने राजापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.