मोडी अभ्यासक स्वरा मराठे यांचे संशोधन
संगमेश्वर:-छत्रपती शिवाजी महाराजांनी शृंगारपूरवर केलेल्या स्वारीची माहिती देणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक मोडी कागद उजेडात आला आहे. मिरज येथील मोडी अभ्यासक सौ. स्वरा ओमकार मराठे यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यातून या स्वारीसंबधी नवी माहिती उजेडात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६१ मध्ये कोकणात मोहीम केली. रत्नागिरीजवळ संगमेश्वरलगत असणाऱ्या शृंगारपूरच्या सुर्वे यांनी आदिलशहाच्या हुकुमनुसार महाराजांसोबत अकारण वैर धरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये तळकोकण मोहीमेत राजापूर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपूरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे शेजारील स्वराज्याच्या मूलखात पूंडावा करत उपद्रव करीत. उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपूरवर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला. चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठ्यांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. आजवर या स्वारीची थोडीच माहिती उपलब्ध झाली आहे. मोडी अभ्यासक स्वरा मराठे यांना उपलब्ध झालेल्या पत्रांवरून या स्वारीची आणखी माहिती मिळणार आहे.
श्री. मराठे यांना उपलब्ध झालेले पत्र म्हणजे संगमेश्वर जवळील मौजे किवरे येथील खोतीच्या वादासंदर्भातील पत्र आहे. सन १८०२ मधीलचे पत्र आहे. अमृतराव कृष्णराव पवार खोत आणि जयराम वागसावंत यांच्यात खोतीच्या हक्कासंदर्भात वाद सुरु होता. यामध्ये दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडताना कैफियती दिल्या आहेत. यामध्ये या परिसराचा पूर्व इतिहास कथन केला आहे. खोती हक्काची बाजू मांडताना पूर्व हकीकतीमध्ये सावंत याचा पूत्र कूक सावंत लहान असताना शिवाजी महाराजांनी शृंगारपूरवर स्वारी केली. शृंगारपूरचा राजा पळून गेला सावंत आणि पवार परागंदा झाले. शिवाजी राजांनी किल्ला बांधला. गावात गडकरी यांनी शेते पेरली, असा उल्लेख आहे. यानंतर सावंत गावी पुन्हा नांदु लागते. शिवाजी महाराजांच्या या स्वारीमुळे या भागात काथ झाले याची माहिती या मोडी पत्रात आली आहे.
मोडी अभ्यासक सौ. स्वरा मराठे या गेली ६ वर्षे मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांच्या सोबत मोडी लिपीतील कागदासंबंधी अभ्यास करीत आहेत. त्यांनी विविध प्रकारची ऐतिहासीक कागदपत्रे वाचली आहेत. शासनाच्या कुणबी शोध मोहिमेत त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांना मिळालेल्या संगमेश्वरच्या कागदांमुळे शिवरायांच्या शृंगारपूर स्वारीची नव्याने माहिती मिळाली आहे.