जय हनुमान दळे संघ अंतिम विजेता
राजन लाड / जैतापूर:-राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे शिवजयंती उत्सव समिती आणि जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमांंबरोबरच कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळपास 12 संघानी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. जैतापूर ग्रामपंचायतच्या डॉ .पाटकर रंगमंचाजवळ पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, लांजा ,राजापूर या तालुक्यांबरोबरच वसई पालघर येथील एका संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत जुवाटी, आंबेवाडी , राजापूर, दळे या संघांच्या लढती अटीतटीच्या आणि प्रेक्षणीय ठरल्या. सेमी फायनल पूर्व सामन्यात जय हनुमान दळे आणि कशेळी संघामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी जय हनुमान दळे संघाने कशेळी संघावर मात करत सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जुवाटी या तुल्यबळ संघाचा सामना करावा लागला. मात्र अंतिम सामना एकतर्फी झाल्याने प्रेक्षकांना अपेक्षित थरार अनुभवता आला नाही.
जय हनुमान दळे संघाने गांगेश्वर हातिवले या संघावर सहज मात करत अंतिम विजेतेपद पटकावले.
शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेसाठी पंच म्हणून गावखडी येथील अनेक कबड्डी तज्ञ पंचानी जबाबदारी सांभाळली.
अंतिम विजेत्या जय भवानी दळे संघाला 11111 रुपये आणि चषक तसेच उपविजेता संघाला 7777 रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शिवजयंती उत्सवासाठी आणि कबड्डी स्पर्धासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवजयंती उत्सव समिती आणि जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.