मुंबई:-‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्याच दिवशी ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवल्याचं पाहायला मिळालं.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ‘छावा’ हा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ३३.१ कोटींचा गल्ला जमावला होता. अवघ्या ५ दिवसांत सिनेमाने १७१.२८ कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी ‘छावा’ सिनेमाचं आणि विकी कौशलच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करत आहेत. ‘छावा’ पाहिल्यावर सगळ्याच प्रेक्षकांना सिनेमागृहातच अश्रू अनावर होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांकडून ‘छावा’ मराठी भाषेत सुद्धा प्रदर्शित व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. अभिनेता संतोष जुवेकरने नुकतंच इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केलं यादरम्यान त्याला सुद्धा सिनेमा मराठीत प्रदर्शित होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. आता याबाबत मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शकांची भेट घेऊन सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होईल असे संकेत दिले आहेत.
‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. ‘छावा’ चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. आमच्याबरोबर अमेय खोपकर देखील उपस्थित होते.’ असं मंत्री उदय सामंत यांनी एक्स पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं आहे.