मुंबई:- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अनेक ठिकाणी सिनेमा हाऊसफुल असल्याचं पहायला मिळतंय.अशातच आता छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रात छावा सिनेमा ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, असं सांगितल आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर नेहमी अन्याय केला. मात्र, त्यांच्यावर खूप चांगला सिनेमा आला आहे. या ऐतिहासिक सिनेमाला करमुक्त करण्याची मागणी होताना दिसतीये. परंतू एक लक्षात घ्या की, महाराष्ट्रात करमणूक करच नाहीये. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला होता. त्यामुळे आपल्याकडे करमणूक करच नसल्याने करमुक्त करण्याचा विषयच येत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलं आहे.
राज्य सरकारने छावा चित्रपट करमुक्त करायला हवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत हिंदी चित्रपट ‘छावा’ करमुक्त करण्याबाबत मराठा सेवा संघ, छावा संघटना तर्फे पारोळा तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन दिलं होतं.