महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शिष्टमंडळास दिले आश्वासन
दिल्ली:- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठीची मागणी योग्य असून यासाठीची आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यासाठी सर्व संबंधितांची संयुक्त बैठक मुंबई येथे आयोजित करू, अशी ग्वाही केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली व खंडपीठाच्या मागणीचा तात्काळ सकारात्मक निर्णय होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली त्याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी देशातल्या विविध राज्यातील उच्च न्यायालयांच्या खंडपीठांचा, राज्याच्या आकारमानाच्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या खंडपीठांच्या संख्येचा आढावा घेतला तसेच कोल्हापूर खंडपीठामध्ये किती जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा लाभ होईल याची माहिती समजावून घेतली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर खंडपीठ हे कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांसाठी या जिल्ह्यातील व्यापारी उद्योजकांच्यासाठी अत्यावश्यक असून गेले अनेक वर्ष कोल्हापूर सह या सर्व जिल्ह्यातील जिल्ह्यातील बार असोसिएशन, विविध संस्था, संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या विषयावर तात्काळ निर्णय होण्याची आवश्यकता असून केंद्रीय कायदा मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी केली.
केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर बैठक घेण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे संदीप भंडारी, कायदा समितीचे सदस्य ॲडव्होकेट जे.विकास, जे के जैन व अन्य मान्यवर उपस्थित होते.