सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई – गोवा महामार्गावर घडली.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह इतर सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
याबाबत माहिती अशी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका या इतरत्र असल्याने रुग्णाला घेऊन जाण्यासाठी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला वजराठ येथील रुग्णाला लघुशंकेचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. या रुग्णाला बसवून रुग्णवाहिका रात्रीच्या सुमारास गोवा – बांबुळीच्या दिशेने रवाना झाली.
मात्र, रुग्णवाहिका गोवा राज्यातील म्हापसा येथील कोलवाळ फुलाजवळ गेली असता रुग्णवाहिकेमधून धुराचे लोट येऊ लागले. समोर बसलेल्या चालक व अजून एका व्यक्तीने हा सर्व प्रकार बघितल्यावर त्यांनी लागलीच आरडाओरड करत रुग्णवाहिका थांबवली. त्यानंतर रुग्णवाहिकेत बसलेल्या रुग्णाला व त्याच्या नातेवाइकाला उतरण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण रुग्णवाहिकेतून उतरले. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने त्याला लागलीच उतरविण्यात आले.
प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली
रुग्णवाहिकेचा भडका उडाला. त्यानंतर रुग्णवाहिकेने पेट घेतला आणि अल्पावधीतच रुग्णवाहिका जळून खाक झाली. ही घटना महामार्गावर घडल्याने अनेक वाहने थांबविण्यात आली होती. त्यानंतर म्हापसा अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेबाबत आरोग्य विभागाला पुसटशीसुध्दा कल्पना नव्हती. मात्र, सर्वच यंत्रणा अलर्ट झाली आणि त्यांनी नंतर माहिती घेण्यास सुरुवात केली. पण, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.