रत्नागिरी : वकिली, उलटतपासणी हे वकिलाचे काम आहे. पण वकिली हा उद्योग नाही. नवनवीन अशिल येत असतात. परंतु आपण कशा पद्धतीने काम करतोय. याकडे लक्ष राहिले पाहिजे. वकिलीचे काम सचोटीने केले पाहिजे. रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांची स्मृती ठेवून वारसा जपला पाहिजे. त्यांनी सचोटीने केलेले काम आपण शिकले पाहिजे. त्यांची तैलचित्रे नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालक तथा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.
जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये बार असोसिएशनच्या नव्या हॉलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी रत्नागिरीतील नामवंत वकील स्व. बापूसाहेब परुळेकर, स्व. केतन घाग, स्व. मुसा डिंगणकर आणि स्व. नारायण तथा नाना गवाणकर यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जामदार यांनी केले. कार्यक्रमाला मंचावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, ज्येष्ठ वकिल फजल डिंगणकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या वेळी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली.
न्या. जामदार म्हणाले की, आजचा दिवस चांगला आहे, म्हणजे छत्रपतींची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचं केंद्र आहे. हा जनतेचा राजा आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सर्वांनी स्फूर्ती घेतली पाहिजे. आज ज्यांची तैलचित्र अनावरण केली त्या सर्वांना मी जवळून ओळखत होतो. पालक न्यायाधीश म्हणून पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करत आहे. वकिल वर्गाच्या चांगल्या योगदानामुळे न्यायिक कामही चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्व बार असोसिएशनला कॉम्प्युटर, प्रिंटर दिले. या नव्या हॉलसाठीही तातडीने निर्णय घेतला. पालकमंत्र्यांनीही याकरिता निधी वितरित केला. आज ते साहित्य संमेलनामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. रत्नागिरी बार असोसिएशनची ख्याती आहे.
प्रास्ताविकामध्ये ॲड. विलास पाटणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉलसाठी ३० लाख रुपये मंजूर केले आणि वर्षभरातच काम पूर्ण झाले आहे. यापुढेही बार असोसिएशनच्या मागण्याही मान्य करू, असे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक टप्प्यावर कोणी मदत केली याची जाण व भान म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तैलचित्रे साकारली. कृतज्ञता आपल्या शब्दात, विचारांत आणि वागण्यात दिसली पाहिजे. कृतज्ञता आपल्याला सन्मार्गावर ठेवेल. त्यासाठी आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात सर्वांत अविस्मरणीय आहे.
याप्रसंगी ॲड. बाबा परुळेकर, ॲड. जी. एन. गवाणकर, ॲड. फजल डिंगणकर आणि ॲड. संकेत घाग यांनी मनोगतामध्ये तैलचित्र लावलेल्या चारही दिग्गजांचे अनुभव, आठवणी थोडक्यात सांगितल्या. अशा व्यक्तीमत्वांची तैलचित्रे नवोदित वकिलांना नेहमीच प्रेरणादायी, स्फूर्तीदायी ठरतील, असे मनोगतामध्ये सांगितले. सचिव ॲड. रत्नदीप चाचले यांनी सूत्रसंचालन केले. ॲड अवधूत कळंबटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.