चिपळूण (प्रतिनिधी) : ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल व टाटा ट्रस्टस् आयोजित ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पामधील महाराष्ट्रातील एकूण चार केंद्रांपैकी एक महत्वाचे केंद्र असलेल्या चिपळूण केंद्र (Hub) अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल सती-चिंचघरी, महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबडस, आर. सी. काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेढे या पाच शाळांमध्ये या प्रकल्पाची उपकेंद्रे गेले वर्षभर सातत्यपूर्वक सुरु आहेत.
या पाचही उपकेंद्रांमधील एकूण १९५ खेळाडूंनी “SVJCT क्रीडा संकुल डेरवण” या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धांमध्ये आपापल्या उपकेंद्राचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेमध्ये डॉजबॉल, लंगडी, मोडीफाइड राउंड रन, ८ x ५० मी रिले या सांघिक स्पर्धा तर १०० मी तसेच ५० मी शर्यत, मेडिसिन बॉल थ्रो, टेनीस बॉल थ्रो अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धांमध्ये सर्वाधिक खेळामध्ये विजयी ठरणाऱ्या उपकेंद्राला सर्वोत्कृष्ट उपकेंद्र २०२४-२५ हे देण्यात येणार होते. या किताबासाठी आकले व भोम या उपकेंद्रांमध्ये स्पर्धेची चुरस रंगली होती ,व शेवटी फार थोड्या गुणांच्या फरकाने भोम हे यावर्षीचे सर्वोत्कृष्ट उपकेंद्र ठरले. या स्पर्धेच्या माध्यमातून काही गुणवंत खेळाडूंची निवड करून त्या खेळाडूंना चिपळूण केंद्राच्या वतीने निगडी येथे होणाऱ्या केंद्रीय स्पर्धांमध्ये चिपळूण केंद्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या केंद्रीय स्पर्धांमध्ये चिपळूण केंद्रासोबत बारामती, हराळी, मावळ असे एकूण चार हब स्पर्धेच्या माध्यमातून समोरासमोर येणार आहेत
या प्रसंगी डॉ. आनंद लुंकड (खोखोचे राष्ट्रीय प्रशिक्षक) यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात केली. तसेच यावेळी या प्रकल्पाचे मॅनेजर संकल्प थोरात, स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट अश्वगंधा पारडे, चिपळूण केंद्र क्रीडाकुल प्रकल्प समन्वयक तुषार कदम व सहाय्यक केंद्र क्रीडा प्रशिक्षक विशाल सुर्वे उपस्थित होते. तसेच गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अमोल सुर्वे, देवराज गरगटे आणि ज्ञान प्रबोधिनी चिपळूणचे सदस्य माधव मुसळे व डॉ. सौ. स्वाती मुसळे यांनी स्पर्धेत उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.