पाचल : राजापूर तालुक्यातील अर्जुना
नदीच्या खोऱ्यात करक-पांगरी येथे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे राजापूर-लांजा पूर्व भागातील एकूण ५,७०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनात लाभार्थी शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे.
अर्जुना मध्यम प्रकल्पाला १९९५ मध्ये मंजूर देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनंतर हे काम पूर्णत्वाला आले आहे. या प्रकल्पातील लाभक्षेत्रातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या भागातील लोकांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. भात, नाचणी, काजू, आंबा बागायत यावरच येथील दैनंदिन व्यवहार सुरू असतात.
लाभक्षेत्रातील सर्वसामान्य लोक हे गरीब आहेत. लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी लाभधारकांचा सहभाग घेऊन, प्रकल्पाचे लाभ क्षेत्र सिंचनाखाली आणणे गरजेचे आहे.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, प्रकल्पाची संपूर्ण माहिती, त्यांच्या मनातील शंका व अडचणी दूर करण्यासाठी काम करावे, यासाठी अर्जुना मध्यम प्रकल्प व त्याचे कालवे मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरणार आहेत.
हा प्रकल्प केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी योजनेमध्ये समाविष्ट असून, प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत, मुबलक व वेळेवर पाणी देणे हा उद्देश आहे. यादृष्टीने पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करून व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले, तर हा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास फार वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.