ट्विटरवरून अभिवादन ऐवजी वापरला श्रद्धांजली शब्द
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती निमित्त ट्विटरवर (एक्स) संदेश जारी केला.
यामध्ये त्यांनी अभिवादनाऐवजी श्रद्धांजली असे नमूद केले. यावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसेच सोशल मिडीयात राहुल गांधींवर जोरदार टीका होते आहे. देशभरात राहुल गांधी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. सोशल मीडियावरदेखील शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही पोस्टद्वारे छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केले आहे. पण, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करताना मोठी घोडचूक केली आहे. त्यांनी अभिवादन करताना, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, नेटकऱ्यांनी यावर राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींच्या या पोस्टवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी ही चूक जाणूनबुजून झाल्याचा आरोप केला आहे. अनेक नेत्यांनी छत्रपतींना वंदन करणारा फोटो शेअर केला असतानाच राहुल गांधींनी छत्रपतींचा पुतळा हातात उंचावणारा फोटो जारी केल्यावरूनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.