स्कॉर्पिओ व्हॅनसह दुचाकीचाही समावेश
साताऱ्यातून खेडमध्ये विक्रीसाठी आणला जात होता गांजा
खेड:-तालुक्यातील खोपी- रघुवीर फाटानजीक गांजा वाहतूकप्रकरणी एका महिलेसह तिघांना मंगळवारी पोलिसांनी रात्री उशिरा गजाआड केले. संशयितांकडून 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा, स्कॉर्पिओ व्हॅनसह एक दुचाकी साहित्य असा 31 लाख 56 हजार 747 रूपयांचा ऐवज जप्त केला. गांजा विक्रीचे सातारा ‘कनेक्शन’ समोर आले असून मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
लक्ष्मण कुंदन भोरे (40), उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (36 दोघे रा. माझगावकर माळ झोपडपट्टी-सातारा), अविनाश हरिश्चंद्र मोरे (45, महाबळेश्वर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. स्कॉर्पिओ व्हॅन (एम.एच. 09 डी.ए. 8554)मधून आलेले दोघेजण आणि दुचाकीवरून (एम.एच. 11 डि. पी. 4260) आलेला एकजण संगनमत करत गांजाची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सापळा रचला असताना तिघांनाही गांजासह रंगेहाथ पकडले. दोन्ही वाहनांची पोलिसांनी झडती घतली असता 2 किलो 84 गॅम वजनाचा व 31 हजार 197 रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला. पुन्हा एकदा पोलिसांनी गांजा वाहतूकप्रकरणी तिघांना जेरबंद करत गांजा वाहतुकीचे सातारा ‘कनेक्शन’ उघड केले आहे.
याबाबतचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.