खेड :मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर संरक्षक भिंतीचा भाग खचत चालला आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी केवळ मलमपट्टी केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंत झालेल्या चौपदरीकरण कामामुळे वाहनालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळण ‘डेंजर स्पॉट’ ठरत आहे. गेल्या 4 महिन्यात भोस्ते घाटातील अवघड वळणावर 30 हून अधिक अपघात घडले आहेत. यात अवजड वाहतुकीच्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटून थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंत खचत आहे. यासाठी साऱ्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. 15 दिवसांपूर्वी मालवाहू ट्रक थेट संरक्षक भिंतीवर आदळून मध्यभागी लटकला होता. त्या पाठोपाठा मालवाहू ट्रकही संरक्षक भिंतीवर आदळून थेट दरीत कोसळला होता. यामुळे संरक्षक भिंतीला दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. यामुळे वाहने हाकताना वाहनालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.