206 प्राथमिक शाळांचे प्रस्तावही मंजूर
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन 2024 – 25 या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी 3 कोटी 63 लाख रुपये मंजूर केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 206 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. शाळा दुरुस्तीसाठी 267 प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते. त्यापैकी 206 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर 61 शाळांच्या नादुरुस्त इमारतींसाठीही निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
या धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी मंजूर करण्यात आला असून या शाळा लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहेत.