महसूल सहाय्यकपदी नियुक्ती
राजन लाड / जैतापूर: ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. एमपीएससीसारख्या परीक्षेत कसोटी पणाला लावून त्यामध्ये यश प्राप्त करण्यात आता कोकण मागे राहिला नाही. राजापूर तालुक्यातील, खरवते गावची सुकन्या संजना सूर्यकांत कानागल हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून तिची महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे.
संजना हिचे माध्यमिक शिक्षण उत्कर्ष विद्यामंदिर खरवते येथे झाले. सन २०२२ मध्ये उच्च माध्यमिक कला,वाणिज्य महाविद्यालय लांजा येथून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर तिने राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर येथे जाऊन डॉ. विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात
तिने यशाला गवसणी घातली. कुणबी समाजातील अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजना हिने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर खरवते कोंडवाडी बरोबर तालुक्याचे नाव रोशन केले आहे. संजना हिची आई, अंगणवाडी सेविका असून वडील, काका शशिकांत कानागल यांच्या ओणी येथे असलेल्या सुवर्णकार व्यवसायाला मदत करतात. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर संजना हिने मिळविलेल्या यशाने खरवते गावासह तालुक्यातील तरूणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.