ठेवीदारांचे पैसे देण्यास संस्थेत पैसेच नाहीत
खेड : खेडमधील भरणे नाका येथील एक सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत निघाली असून या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. शेकडो ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पतसंस्थेत पैसे नाहीत असे सांगितले जात आहे. त्यामुळे ठेवीदार धास्तावले आहेत. खेड तालुक्यातील शेकडो ठेवीधारकांनी तसेच अल्पबचत खाते धारकांनी पतसंस्थेत जाऊन आपला संताप व्यक्त केला.
शाखाधिकारी आणि संचालकांना धारेवर धरून त्यांना घेराव घातला. घटनास्थळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक दाखल झाले. पतसंस्थेत शाखाधिकारी यांनीच बनावट चलने तसेच कागदपत्रे व पावती पुस्तके तयार करून हा घोटाळा केला असल्याची कबुली शाखाधिकाऱ्यांनी दिली. संस्थेचे लेखापरीक्षण सुरू केले असून बनावट चलने तसेच पावती पुस्तके तयार करणाऱ्या विरोधात तक्रार देण्यासाठी शेकडो ठेवीदार आणि संस्थेचे अध्यक्ष पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. खेड पोलीस ठाण्यात संबंधित शाखा अधिकारी व या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही पतसंस्था सन १९८६ साली स्थापन झाली असून या पतसंस्थेची एकच शाखा भरणे येथे सुरू आहे. या पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची चर्चा २०२३ पासून सुरू होती. सध्या या पतसंस्थेचे लेखापरीक्षण सुरू असून त्यानंतरच नेमक्या किती रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला हे आपल्याला समजू शकेल, अशी माहिती संस्थेच्या संचालक मंडळाकडून देण्यात आली होती.
सर्व ठेवीदारांचे पैसे परत देण्यात येतील, अशी माहिती पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यांच्याकडून वेळोवेळी ठेवीदारांना दिली जात होती. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील ठेवीदारांनी या संदर्भात मौन बाळगले होते, अशी माहिती ठेवीदार रुपेश चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत सर्व ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत सर्व संचालकांच्या दारात ठेवीदारांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.