राजापूर:-राजापूर जवाहर चौक ते रानतळे या रस्त्याचे रूंदीकरण व खड्डे बुजविण्याचे काम करताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान रस्त्यावरील पाणीपुरवठा वाहिन्यांचे काम योग्य प्रकारे न, केल्याने पाईपलाईन फुटल्याचा आरोप नागरीकांतून करण्यात येत आहे.
राजापूर नगरपरिषदे मार्फत जवाहर चौक ते रानतळे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार सूचना देऊनही नगरपरिषदेने नळ पाण्याची पाईपलाईन न, बदलल्यामुळे रस्त्याचे काम सुरू करताच सदर पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. जवाहर चौक ते रानतळे रस्त्याचे काम मंगळवार सकाळपासून सुरू करण्यात आले, परंतु काही मिनिटातच पाईपलाईन फुटल्याने सदर काम थांबले आहे.
याबाबत नगरपरिषदेला नागरिकांनी वारंवार कळवूनही त्यावर नगरपरिषदेने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आज बुधवारी रस्त्याचे काम थांबले आहे. सदर पाईपलाईन ही, सिमेंटची असून रस्त्यापासून अर्धा फूटही खोल नाही त्यातच रस्त्याचे काम चालू झाल्यावर त्यावर व्हायब्रेटर फिरवण्यात येणार असून सदर पाईपलाईन अधिक फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.