रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘हर हर महादेव’ अशा जयघोषात, लेझीम, ढोलच्या निनादात आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थींनी या पदयात्रेत लक्ष वेधून घेत होत्या.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले. यानंतर रा.भा. शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थीनी रुबीना सय्यद, पृथा पांचाळ, अहना पेठे, पायल वसावे यांनी पोवाडा म्हटला.
अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला.
ही पदयात्रा मारुती चौकातील शिवसृष्टीजवळ आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा शासकीय रुग्णालयाजवळ आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विद्यार्थ्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांचा पेहराव आणि पदयात्रेतील सहभागी विद्यार्थिनींनी केलेला पारंपरिक पोशाख सार्वांचे लक्ष वेधून घेता होता. लेझिम पथम, ढोल यांच्या निनादात छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनविले होते. टिळक आळी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही पदयात्रा रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवसृष्टीजवळ आली. येथेही छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
आरोग्यासाठी चालणे हे फायद्याचे असते. सर्वांनी आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे, त्यासाठी किमान दररोज 1 कि. मी. तरी चालावे. विशेषत: अधिकाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, अधिकाऱ्यांसहा सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले. पदयात्रेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी भिकाजी कासार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सदाफुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, अधिष्ठाता जयप्रकाश रामांनद, बिपीन बंदरकर यांच्यासह दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, जीजीपीएस हायस्कूल, एनसीसी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी
विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, भागेश्वर विद्यामंदिरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.