खेड : कोकण मार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचे खेड ते दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांचे दागिने चोरीचे प्रकार पुन्हा वाढल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. शिला पांडुरंग थरवळ (६८, रा. विन्हेरे-महाड) यांनी तक्रार नोंदवली आहे. त्या सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसमधून पती व इतर नातेवाईकांसमवेत प्रवास करत होत्या. गाडीतील गर्दीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास येताच पोलीस स्थानक गाठले. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.