मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश
चिपळूण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा मागे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असे नाव लिहिण्यात आले होते परंतु श्रीमंत या शब्दावर मराठा क्रांती प्रतिष्ठानने हरकत घेतल्यानंतर चिपळूण नगर परिषदेने तातडीने कार्यवाही करत हा शब्द हटवला व छत्रपती शिवाजी महाराज असे नाव ठेवले याबद्दल शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
चिपळूण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे सदरचा पुतळा कोकणातील एक महत्त्वाचे आकर्षण आणि श्रद्धास्थान बनले आहे. मात्र नाव देताना अनावधानाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले होते ही बाब अनेकांना खटकत होती. छत्रपतींच्या नावामागे श्रीमंत हा शब्द कधीच आलेला नाही व इतिहासात सुद्धा या संदर्भातला दाखला नाही. त्यामुळे सदरचा शब्द हटवण्यात यावा अशी लेखी मागणी येथील मराठा क्रांती प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेने चिपळूण नगरपरिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली मुख्याधिकारी श्री.भोसले यांनी या विषयावर तात्काळ प्रतिसाद देत सदरचा शब्द हटवला शिवजयंतीच्या पूर्वी हा शब्द हटवल्या नंतर अनेक शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी याबाबत नगरपरिषद प्रशासन तसेच मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे आभार व्यक्त केले आहेत. प्रतिष्ठानने आपल्या दिलेल्या निवेदनामध्ये पुतळ्या संदर्भातल्या बाकी विषयांमध्येही काही मागण्या केलेल्या आहेत व त्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भातही प्रशासन कार्यवाही करत असल्याचेही निदर्शनास येत असल्याबद्दल प्रतिष्ठान तर्फे नगर परिषदेचे अभिनंदन करण्यात आले आहे.