मुंबई:- राज्यमंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत 6 मोठे निर्णय घेण्यात आले. परंतु, कॅबिनेट मिटींगचा अजेंडा बैठकीपूर्वीच प्रकाशित झाल्यामुळे मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाले असून त्यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना अशाप्रकारे पुन्हा वागू नये, यासाठी तंबी दिली. याबाबत आता सूचना केल्यानंतरही बदल झाला नाही तर थेट कारवाई करु, असा देखील मोठा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, आपण आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना याबाबत दम दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कॅबिनेटचा अजेंडा अशाप्रकारे बाहेर पडणे म्हणजे गुप्त माहिती बाहेर देण्यासारखे आहे. आपण मंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतो. त्यामुळे मंत्र्यांनी असे कृत्य केले तर गोपनीयतेचा भंग होतो. असं कृत्य केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: माध्यमांना माहितीदेखील दिली.
मंत्रिमंडळ बैठक होण्याआधीच काही लोके अजेंडा छापत आहेत. ही चुकीची पद्धत आहे. मी मंत्र्यांना देखील सांगितले आहे की, आपल्या कार्यालयांना सांगा. अन्यथा मला कारवाई करावी लागेल. कॅबिनेटचा अजेंडा हा पूर्णपणे गुप्त असतो. आपण गोपनियतेची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे जी माध्यमे कॅबिनेटच्या आधी कॅबिनेटचा अजेंडा दाखवत आहेत. कृपया आपल्या टीआरपी किंवा पेपरच्या खपाकरता अशाप्रकारे नियम मोडू नका असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.