दापोली:- राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली तालुक्यात विविध कार्यक्रमांना सुरवात झाली असून गेली अनेक महिने बंद असलेली उन्हवरे-दापोली-मुंबई या बससेवेचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम दापोली बसस्थानकात झाला.
दापोली मतदार संघाचे आमदार व राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे विविध कार्यक्रम झाले. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद, कोकण एसटी प्रेमी व दापोली पंचायत समिती माजी सभापती ममता शिंदे यांच्या पुढाकाराने गेली अनेक महिने बंद असलेली फरारे मोगरेवाडी-उन्हवरे मुंबई ही बससेवा दापोली आगराच्यावतीने सुरू करण्यात आली. या वेळी शिंदे यांनी ३२ गावांमध्ये ही बस अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले होते; मात्र कोरोनानंतर ही बससेवा अनियमित झाली असून, आता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे. दापोली आगाराने ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवून परिसरातील जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. या वेळी माजी सभापती किशोर देसाई, माजी समाजकल्याण सभापती चारूता कामतेकर, कोकण एसटी प्रेमी राज्य उपाध्यक्ष विकास गुरव, सचिव शैलेंद्र केळकर, उन्हवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुराद चिकटे, माजी उपसरपंच मंगेश शिंदे, वावघर पोलिस पाटील गौसिया चिकटे आदी उपस्थित होते.